त्या पेपरमध्ये रोजच दिसतात मला
विकले गेलेले शब्द, विकलेले विचार;
लाचार मने, वाढलेली महागाई;
माजलेली सरकार, परेशान जनता...
पानोपानी ऐकू येतो मला रोज
त्या अत्यचारीत महिलेचा आक्रोश;
नांदा सौख्यभरे म्हणता म्हणता
त्याच सुनेचा सासुरवास म्हणून
हुंडयापायी होणारा तिला जाच, छळ;
शेजारी-शेजारी असा खेळ खेळताना
दिसतात मला.. ऐकू येतात..
वीतभर जागेवरून त्याच जागेवर..
होणारे भांडण, पडणारे मुडदे; त्यांचे विव्हळणे;
ती जागा पेपरची आता लाल झाली आहे..
तिच्या खूनाने; त्या जागेपायी गेलेल्या
त्या शेजार्याच्या लाल रक्ताने;
गरीब हा गरीबच होत आहे..
श्रीमंत हा श्रीमंतच होत चालला आहे;
अशी लूट चालवली आहे..
त्या एका माणसाने, त्या सरकारने;
चुटकीसरशी दाबले जातात प्रकरण त्यांच्या
भ्रष्टाचाराचे, त्यानी केलेल्या बलात्कारचे;
जनतेच्या लुटलेल्या पैश्याचे;
कागदोपत्री तक्रार दाखलपण होते;
खाली असतो एक शब्द..
आदेशावरून ******;
हाच असेल त्यांचा आदेश बहुतेक;
कालांतराने शब्दपण ते आता
शरमेने.. लाजून.. जातील निघून
दूर कुठेतरी, पसार होऊन;
आज परत..
मी वाचतो आहे तोच पेपर;
मला शब्दच दिसत नाहीत कुठे ?
दिसतो आहे तो फक्त एकच रंग..
लाल; लाल; लाल;
© आदित्य अ. जाधव...!!!

No comments:
Post a Comment